विसापुर हा पुणे जिल्ह्यातील एक किल्ला असून मुंबई-पुणे महामार्ग आणि लोहमार्ग दोन्ही पासून जवळ आहे. किल्ल्यावर जायला दोन्ही मार्ग सोयीस्कर आहेत. मुंबई पुणे रस्ता मार्गे - विसापुर पुण्याहून 60 ~ किमी. वर आहे. लोणावळच्या आधी मळवली गावातून डावीकडे स्टेशन जवळून रस्ता किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जातो. रेल्वे मार्गे - पुणे- लोणावळा लोकलने मळवली स्टेशनवर (लोणावळा आधीचं स्टेशन ) उतरावे. मळवली स्टेशनपासून विसापुर किल्ला 9 किमी वर आहे. इथून रिक्षा किंवा टमटम करून जाता येईल किंवा पायी पण जाऊ शकतो.
स्टेशनपासून पुढे गेलं की सुरूवातीला डावीकडे
भाजे लेणी लागते. अजून समोर गेलं की डावीकडे विसापुर तर उजवीकडे लोहगड दिसतो. विसापुर
हा लोहगडाहून उंच आहे. लोहगड सारखाच विसापुर एका उंच डोंगर माथ्यावरच्या पठारावर वसलेला
किल्ला आहे. आकराने मोठा आहे. विसापुर हा लोहगडानंतर बांधला गेला - पेशवे कालात आणि
नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
किल्ल्यावरचे वैशिष्ट्ये - किल्ल्याला चहू बाजूने वेढनारी प्रचंड तटबंदी !! अन तिच्यात थोड्याथोड्या अंतरावर रोवलेले बुलंद बुरूज!
-अजून
एक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे किल्ल्यावची
प्रचंड तळे आणि टाके.
-काही
मोठाल्या इमारतीचे अवशेष आहेत.
-एका
उभ्या खडकावर मोठा हनुमान कोरलेला आहे.
विसापुर
सोबत एका दिवसांत करता येतील अशा गोष्टी - किल्ले लोहगड, बेडसे, भाजे, किंवा कार्ला
लेणी. (विसापुर सोबत यापैकी एक स्पॉट एका दिवसांत आरामात होऊ शकतो. आम्ही बेडसे लेणी
करून मग विसापुर पाहिला.)
खाण्याची
आणि राहण्याची सोय - मळवली तसेच लोहगड पायथ्याशी लोहगडवाडीला नाष्टा व जेवायची सोय
आहे. तसेच मुंबई पुणे रस्त्याने येत असाल तर
रस्त्यावर हॉटेल्सची काही कमी नाही. गडावर खायची किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
वरती मुक्कामाला थांबायला अवघड आहे कारण छत असलेली इमारत शिल्लक नाही अन् वरती हवा
खूप असते.
आम्ही हा ट्रेक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात
केला. नुकताच पाऊस पडून गेलेला. सगळीकडे हिरवळ अन मधेच धुकं आणि पावसाचे शिपके! पायथ्यापासुन
चालायला लागल्यावर एक दिड तासात किल्ल्यावर. रस्ता झाडीतुन जातो. वरती पोहोचल्यावर
एक ईमारत स्वागताला उभी आहे. बहुधा शिपायांसाठी असावी. पण आता बरीचशी मातीखाली दबली
आहे. वर किल्ला सपाट आहे फक्त मधोमध एक टेमकाड आहे. किल्ला रमतगमत जरी पाहिला तरी दोन
तासांच्या आत होईल.
किल्ल्यावरची
भली मोठी तटबंदी आणि तिच्या वरून फुलांमधून जाणारा रस्ता. तटबंदी एकदम शाबूत आहे. काळ्या
दगडावर केलेलं सुंदर आणि तेवढच मजबूत बांधकाम!
पानांत गुंफलेलं ''पर्णगुंफी" फुल! (parnagumphi / phyllocephalum tenue)
तेरडा
फुलांचा ऋतू संपता संपता रानफुले आपल्या बिया टाकतात. ह्या बिया अशाच मातीत पडून राहतात - पुढच्या पावसाळ्यापर्यंत! तेरड्याच्या बिया ह्या छोट्या शेंगांमधे झाडाला लटकलेल्या असतात. ऋतू संपायला आल्यावर ह्या शेंगा टपाटप फुटतात आणि आतल्या बिया विखूरतात! नुसता हात लावला तरीही त्या फुटतात. इतकेच काय भुंगा किंवा फुलपाखरू बसलं तरी फुटतात!! म्हणूनच ह्या जातीच्या फुलांना इंग्रजीत "Impatiens" असं म्हणतात!!
खोलगट,
दलदलीत किंवा पाणथळीच्या जागी उगवनारी मिसाइल सारख्या आकाराच्या मंजिर्या फुलांचे ताटवे! तुळशीच्या फुलांना मंजिरी म्हणतात. हि फुले तुळशी सारखी दिसतात म्हणून जांभळी मंजिरी!! इवले इवले जांभळे फुलं हवेत डोलताना सुंदर दिसतात. गडावर अशे अनेक जांभळे ताटवे होते!
किल्ल्यावरची थक्क करणारी गोष्ट म्हणजे इथलं प्रचंड मोठ्या प्रमाणावरचं मध्ययुगीन जलसंवर्धनाचं काम! खडकात अनेक टाके खोदून भरपूर पाणी साठवलय. संख्येने अन् आकाराने प्रचंड मोठे टाके. डोंगराचा आकार हा मधातून उंचवटा तर बाजूला निमुळता होत जाणारा आहे. ह्या उतारांवर टाक्यांचे एक जाळंच तयार केलेले आहे. पावसाचं पाणी सुरूवातीस वरच्या टाक्यांमधे गोळा होतं. ती भरली की खाली असलेली टाके भरतात. असं करत किल्ल्यावरची सगळे टाके भरल्यावरच पाणी धबधब्यांवाटे डोंगराखाली ओघळतं. पाण्याचा एक एक थेंब वाचवण्याचं प्रयोजन! दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला आजही यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे.
असच चालत चालत थकल्यावर एका टाकीत पाण्यात पाय
सोडून बसलो. थंडगार पाणी - एकदम थकवाच जातो. जलतत्वात नकारात्मक शक्ती शोषून घ्यायची
कमालीची ताकद असते! दुर्दैवाने आज पाणीच शुद्ध करायची वेळ माणसावार आलीय! टाक्याच्या आजूबाजूला
सोनकीचे ताटवे. त्यावर एखाद दुसरं फुलपाखरू बसायचं!! मध्येच एखादा बेडूक पाण्यात उडी
मारायचा अन पाण्यात भाकर्या उमटायच्या! अशी सगळी मजा बघत बसलो.
खाली बोरघाटातून जाणारा मुंबई पुणे महामार्ग दिसतो. बोरघाट हा देश आणि कोकणला जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग आहे. यावर देखरेखीसाठीच लोहगड आणि विसापुर या किल्ल्यांची निर्मिती झाली असावी.
किल्ल्यावर
काही मारक्या म्हशी अन् रेडे चरत होते. त्यातला एक रेडा पाय घासत आमच्याकडे धावला.
जे पळत सुटलो! रेडा केव्हाचा थांबला पण आम्ही पळतच होतो. त्यांच्यापासून दूर गेल्यावरच
जिवात जिव आला!
असच गडाला वळसा घालून आलो अन त्याच वाटेने उतरलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो. अजस्त्र असा विसापुर किल्ला पाहून!!
Superb... masta majja ali... panyat pay sodun baslyasarkha anubhavla.....
ReplyDelete